Tuesday, November 08, 2011

मी अनुभवलेली अमेरिका (६)

यहाँ की खामोशी मुझे पसंद है,, यहाँ बहूत सुकून है,, इधर इतना सेफ है की इंडियामें जानेका मन ही नही करता,, ही सर्व वाक्ये माझ्या मैत्रिणींची आहेत. पाकिस्तानी, तेलगू, तमीळ, श्रीलंकन अशा सर्व मैत्रिणींना अमेरिका आवडते, मराठी मुलींनाही! पण मला अजून तरी कोणी मराठी मुलगी अथवा मराठी जोडपे प्रत्यक्षात भेटलेले नाही. बरेच मराठी मित्रमंडळ ऑनलाईन भेटलेले आहे.







या सर्व मैत्रिणींशी गप्पा मारताना त्यांचे विचार मला कळाले. मी मनात म्हणायचे की ह्या सर्वजणी असे का म्हणत आहेत? मलाच फक्त का आठवणी येतात भारतातल्या? या सर्वजणी इथे इतक्या रममाण कशा काय? माझी एक तेलगू मैत्रिण होती ती मात्र माझ्याशी गप्पा मारताना तिच्या हैद्राबादच्या आठवणी सांगायची व मी पण तिला पुणे मुंबईच्या आठवणी सांगायचे. आम्हाला दोघींना एकमेकींचा खूप आधार वाटायचा. ही झाली २००१ ची गोष्ट. नंतर जेव्हा तिच्या नवऱ्याने भारतात नोकरी पक्की केली तेव्हा तिचा पूर्ण मूड ऑफ झाला. मला वाटले की ही इतक्या आठवणी सांगत आहे तर तिला भारतात परत जाण्याचा आनंद होईल, पण तसे झाले नाही.







माझी पाकिस्तानी मैत्रिण तर माझ्याच वयाची. तिची व माझी मैत्री झाली २००२ साली. तिचा नवरा तिच्यापेक्षा १५ वर्षाने मोठा व तिला ३ मुले. सर्वजण मेहनती. तिचा नवरा पोस्ट डॉक्टरेट करत होता, अजूनही करतो. माझी अजून एक तेलगू मैत्रिण आहे. तिचा नवऱ्यानेही १० वर्षे पोस्ट डॉक्टरेट केली व आता त्याला नोकरी आहे. हे तेलगू जोडपे सर्वांनाच मदत करायचे. या सर्व मैत्रिणींची व जवळपास सर्व बायकांची अमेरिकेत कायम राहण्याची तयारी आहे. आता ती तयारी का आहे आणि इथे राहण्यासाठी सर्वजण का धडपड करतात त्याचाही विचार मी केला त्याबद्दल नंतरच्या लेखात लिहीन. आमचा अजून एक असाच कुटुंब मित्र आहे तो नेहमी म्हणतो इंडियामें क्या रखा है? मला त्याचा खूप राग येतो, अरे इंडियात तर तुम्ही जन्म घेतलात, तिथले शिक्षण घेतले आणि वर इंडियाला नावे ठेवता? इथे मी काही भारतीय पाहिले आहेत. ते असा काही आव आणतात की त्यांचे हात जणू आभाळाला टेकले. भारतातील भारतीय लोकांना आम्ही अमेरिकेत आहोत याचा टेंभा मिरवतात.








मी म्हणते की तुम्ही भारतात असा किंवा परदेशात असा, ज्याप्रमाणे संधी उपलब्ध होते त्याप्रमाणे सर्वजण नोकरी व आता शिक्षण घेण्यासाठी सर्व देशामध्ये जात असतात. आता नोकऱ्या अस्थिर झाल्या आहेत. पूर्वी तर शक्यतोवर आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जावे लागायचे नाही. आणि काहींना त्या शहरात नोकरीसाठी वाव नाही म्हणून पुण्यातून मुंबई शहरात नोकरी करून स्थिरस्थावर व्हायला लागायचे. आम्ही ४० व्या वर्षी भारतातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून इथे पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी आलो त्याचे कारण की तुमच्या कपाळावर जर foreign returned चा शिक्का नसेल तर तुम्हाला प्रमोशन नाही. शिवाय तिथल्या नोकरीत division closed होण्याची चिन्हे दिसत होती. आम्हाला संधी मिळाली आणि इथे आलो. आम्हाला वाटले की आम्हीच फक्त चाळीशीत इथे आलोत, तर तसे नाही आमच्यासारखे काही जण ४० ते ४५ वयाच्या दरम्यान इथे आले आणि इथे नोकरीत स्थिर झाले. मी असाही एक डायलॉग ऐकलेला आहे, "ये बुढे लोग इधर क्या कर रहे है?"








अमेरिकेत तर तुम्ही आलात, पण पुढे काय? याचा थोडक्यात गोषवारा लिहिते. मागील लिखाणात मी लिहिलेले आहेच की अमेरिकेत वेगवेगळ्या कारणासाठी व त्याकरता लागणारा वेगवेगळा व्हीसा घेऊन इथे येतात. प्रत्येक व्हीसाचा कालावधी वेगळा असतो व त्याच्या अटींची पूर्तता करणे हे वेगळेच. शिवाय इथे आल्यावर आपण ज्या व्हीसावर आलो आहोत तो व्हीसा आधी टिकवावा लागतो व हे खूप जिकीरीचे काम आहे. सतत डोक्यावर टांगती तलवार. या व्हीसाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काम करता व ते व्हीसा टिकवण्याच्या मध्ये कसे महत्त्वाचे आहे हे विचारात घेतले जाते. विद्यार्थ्यांना ५ वर्षाचा व्हीसा मिळतो. तर आम्ही J1 व्हीसावर आलो त्याचा कालावधी होता फक्त १ वर्षे. नोकरीकरता आला असाल तर h1 व्हीसावर यावे लागते. नोकरीवर आला असाल तर ती नोकरी कायम कशी टिकेल आणि व्हीसाची मुदत कशी वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे लागते. व्हिसा टिकवायचा प्रयत्न केलात तरी काही कारणाने ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्या कंपनीचे दिवाळे वाजते किंवा ती कंपनी दुसऱ्या कंपनीत मर्ज होते त्यामुळे ती नोकरी सुटते. दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी बघायची असेल तर गुपचूप सर्व करावे लागते. म्हणजे दुसऱ्या कंपनीत अर्ज, इंटरव्हू वगैरे. कंपनीचे दिवाळे वाजले किंवा तुमचे काम पसंत नसेल तर तुमच्या हातावर नारळ ठेवतात आणि उद्यापासून येऊ नका सांगतात. अशा वेळी तातडीने दुसरी नोकरी किंवा दुसरी पोस्ट डॉक मिळवावी लागते. दुसरी नोकरी किंवा पोस्ट डॉक पकडून व्हीसा टिकवायला लागतो. अन्यथा भारतात परतावे लागते. जे एम एस करायला येतात त्यांचेही शिक्षण पूर्ण झाले की नोकरी नाही तर दुसरे शिक्षण यासाठी त्यांना वेगळा व्हीसा घ्यावा लागतो. काही कारणांसाठी हे सर्व जर का झाले नाही तर भारतात परतावे लागते. भारतात भारतभेटीसाठी जाण्यासाठी स्टॅपिंगसाठी जाणे ही तर अजून एक वेगळी कटकट आहे. ९ सप्टेंबरच्या इराकी हल्ल्यानंतर बरेच जणांना स्टॅपिंगसाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे.








पोस्ट डॉक्टरेट किंवा पिएचडी करताना तुमची publications महत्त्वाची ठरतात. पोस्ट डॉक्टरेट म्हणजे एक प्रकारची कमी पगाराची नोकरी असते. यामध्ये पदवी घेणे व पदवीदान समारंभ नसतो. नवराबायको व एक मुलगा सुखाने नांदू शकतात. पिएचडी मध्ये पदवी असते आणि शिष्यवृत्ती बऱ्यापैकी असते, पण लग्न केले तर शिष्यवृत्ती पुरत नाही. पिएचडी करताना लग्न केले तर खूप कष्टदायक जीवन आहे. पिएचडी करताना बायकोचा जो व्हीसा असतो त्यावर तिला नोकरी करता येत नाही. अशा बायका इथे बेकायदेशीर नोकरी करून संसाराला हातभार लावतात. शिवाय वेळ पण जातो. या बायकांचे कष्ट मी बघितलेले आहेत. त्या सर्वांचे मला खूप कौतुक आहे. ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये phd काय किंवा post doct काय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असेच आहे त्यामुळे हुशारी व मेहनत हे दोन्हीही लागते. विनायकने ३ वर्षे ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पोस्ट डॉक्टरेट केली. बरीच publications आली त्यामुळे त्याचा बॉस त्याच्यावर खूप खुश होता. नुसती पोस्ट डॉक केली नाही तर बरोबरीच्या सर्व जणांना संशोधनात मदत केली. शिवाय पिएचडी विद्यार्थ्यांना पण त्यांच्या कामात मदत केली.







क्लेम्सन मधल्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या दुसऱ्या एका डिपार्टमेंटमध्ये एक श्रीलंकन विद्यार्थी होता. त्याचा बॉस खूप खडूस होता त्यामुळे त्याला पिएचडी करायला ६ ते ७ वर्षे लागली. त्याच्या बायकोला तर माझा साष्टांग दंडवत! तिने बेबीसिटींग करून पैसे कमावले व संसाराला हातभार लावला. काही दिवस नोकरी आहे तर काही दिवस नाही. तिची नोकरी खूपच कष्टदायक होति. तिच्या नोकरीत मी मोजून ४ दिवस तिला रजा मिळावी म्हणून काम केले होते. त्या चार दिवसातच मला खूपच दमायला झाले होते. आता तिच्या नवऱ्याला नोकरी आहे, ग्रीन कार्ड आहे, व एक मुलगाही आहे. सर्वाचे सार्थक झाले. माझ्या माहितीमध्ये अजूनही अशी ३-४ पीएचडी करणारी जोडपी होती. त्यांचे सर्वांचेच जीवन खूप कष्टदायक होते.



क्रमश:.....

4 comments:

  1. Anonymous9:44 PM

    Americevar halla 11 September la zala hota.. 9 September la nahi..

    ReplyDelete
  2. anubhavache bol khup aawadale Rohini tai !! nokarichya uncertanity baddal lihilay te agadi patala ani navryala settle honyasathi help karanarya tumchya maitrnincha kharach kautuk aahe :)

    Waiting for the next part !

    ReplyDelete
  3. :-) Rohini Tai
    . या सर्व मैत्रिणींची व जवळपास सर्व बायकांची अमेरिकेत कायम राहण्याची तयारी आहे. आता ती तयारी का आहे आणि इथे राहण्यासाठी सर्वजण का धडपड करतात त्याचाही विचार मी केला त्याबद्दल नंतरच्या लेखात लिहीन.

    Yavar lihaa............................

    ReplyDelete
  4. तुझ्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! हो लिहीन नक्की. मला बरेच काही लिहावेसे वाटते. भारत अमेरिकेची तुलना केली जाते. इथले प्रत्यक्ष चित्र कसे वेगळे आहे. असे बरेच काही. तुझा प्रतिसाद वाचून मला खूप आनंद झाला.

    ReplyDelete