Sunday, October 30, 2011

हा छंद जिवाला लावी पिसे!!!



माझी फोटोग्राफी सुरू झाली २००१ साली, अमेरिकेत आल्यावर! त्या आधी आपण एखादा कॅमेरा घ्यावा आणि प्रसंगानुरूप काही फोटो काढावेत असे डोक्यातही आले नव्हते. १९९८ साली बाहेरगावी फिरायला गेल्यावर एक कॅमेरा विकत घेतला तो नेपाळमध्ये! मात्र हा कॅमेरा वापरायला सुरवात केली ती सुद्धा अमेरिकेत आल्यावर. त्याआधी कॅमेराबद्दल निरुत्साह का होता, याचे आता खूप आश्चर्य वाटते. कॅमेरामध्ये रीळ भरले होते म्हणून लगेच फोटोग्राफीला सुरवात केली. पहिला फोटो विद्यापीठातले विनायकचे प्राध्यापक ऍलन मर्चंड यांच्या बंगल्याचा काढला. नंतरचा फोटो त्यांच्या शेजारील छोट्या बंगल्याचा काढला, जिथे आमची त्यांनी तात्पुरती राहण्याची सोय केली होती. त्यांच्या बंगल्यासमोर एक मोठे तळे होते, त्याचाही फोटो काढला. असे करत करत माझी फोटोग्राफी सुरू राहिली. सुरवातीला कॅमेऱ्यात रीळ कसे घालतात ते एका मैत्रिणीकडून शिकले.







आयुष्यात पहिल्यांदा हिमवृष्टी पाहिली ती अमेरिकेत. त्यादिवशी दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घेत होते. थोडीशी डुलकी लागणार इतक्यात मैत्रिणीचा फोन आला व मला म्हणाली, "बाहेर बघ काय आहे !" मी विचारले, "काय आहे? " तर म्हणाली, "बघ तर खरे काय आहे ते, मग मला सांग काय पाहिलेस ते!" दार उघडून पाहिले तर पांढरा शुभ्र बर्फ पडत होता. अतिशय आनंदात मी माझ्या मैत्रिणीला फोनवर सांगितले, "बर्फ! मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहत आहे!" लगेच कॅमेरा घेऊन बाहेर गेले, फोटो काढायला लागले आणि काढतच राहिले. नुकतेच एक रीळ भरले होते. ठरवले हे रीळ फक्त बर्फाकरताच! ते रीळ संपते कधी आणि ते प्रिंट करायला टाकते कधी असे मला झाले होते. गॅलरीमधल्या साचलेल्या बर्फात हातानेच एक छोटे फूल व स्वस्तिक काढले त्यावर कुंकवाचे एक-दोन गोल काढले व त्याचाही एक फोटो काढला! त्यानंतर एकदा प्राध्यापक ऍलन मर्चंड व त्यांची बायको नॅन्सी यांना आमच्या घरी जेवायला बोलावले होते. त्यांचे व आमचे जेवताना, गप्पा मारताना असे फोटो काढले. एकदा काही मित्रमंडळी जमा झाली होती त्यांचेही फोटो काढले. त्यातले काही चांगले आले, काही आलेच नाहीत! काय बरे झाले असावे? कदाचित कॅमेरा जुना झाला असेल किंवा कॅमेराचे मॉडेल चांगले नसेल असा विचार करून दुसरा कॅमेरा विकत घेतला. तो होता ऑलिंपसचा. हा कॅमेरा आम्ही क्लेम्सन शहरात गेल्यावर काही दिवसांनी विकत घेतला. त्यानंतर फोटोग्राफी वाढत गेली ती आजपर्यंत! दुसऱ्या कॅमेराने भरपूर फोटो काढले. क्लेम्सन शहर तर फोटोग्राफीकरता खूप सुंदर शहर आहे. त्या निसर्गरम्य शहराचे बरेच फोटो काढले. फॉल कलर्सचे, मी जिथे नोकरी करत होते त्या डे-केअर मधल्या मुलांचे, घराचे, विद्यापीठ परिसराचे, असे अनेकविध फोटो काढले. काही वेळेला रीळ अजून का संपत नाही बरे! असे म्हणून ते रीळ संपण्याकरता मी खटाखट कशाचेही फोटो काढत असे आणि रीळ प्रिंट होऊन आल्यावर बघत बसे. काही वेळेला तर एका तासाच्या आत प्रिंट काढून तिथल्या तिथे लगेच फोटो बघण्याची उत्सुकता असायची. प्रिंट काढताना नेहमी त्याच्या दोन प्रती काढत असे, एक आमच्याकरता कायमस्वरूपी व एक आईबाबा व सासुसासरे यांच्याकरता भारतात पाठवण्यासाठी. नंतर मी दोन तीन अल्बम विकत घेतले व त्यात ओळीने फोटो लावले. नंतर त्या फोटोंची जेव्हा आठवण होईल तेव्हा निवांतपणे सोफ्यावर बसून एकेक करत फोटो बघत बसायचे, असे तर मी अजूनही करते. फोटो पाहताना त्यावेळचा एखादा प्रसंग, एखादी आठवण सगळे काही आठवते. २००४ साली भारतवारी मध्ये मी कॅमेरा नेला होता व आठवणीत राहतील असे बरेच ग्रुप फोटो काढले होते!









जेव्हा मी पाककृती लिहायला सुरवात केली तेव्हा एका मैत्रिणीने मला पाककृतींचे फोटोही काढण्यास सुचवले होते. बऱ्याच पाककृती लिहून झाल्यावर नंतर काही दिवसांनी डिजिटल कॅमेरा घेतला. सुरवातीला डिजिटल कॅमेऱ्याने काही पाककृतींचे फोटो काढले ते इतके चांगले आले नव्हते. नंतर फोटो काढता काढता मला आपोआपच फोटो जास्तीतजास्त चांगला येण्यासाठी काय करावे हे सुचत गेले.












डिजिटल कॅमेरा घेण्यासाठी आम्ही गूगल शोध केला, तेव्हा 'कॅनन पॉवरशॉट ' साठी लोकांचे चांगले अभिप्राय सापडले. म्हणून 'कॅनन पॉवरशॉट' हा कॅमेरा विकत घेतला. त्याने काढलेला पहिला फोटो "गोडाच्या शिऱ्याचा" होता. डिजिटल कॅमेऱ्याने काढलेले फोटो पाहताना इतके काही सुंदर दिसायचे की आणखी काढावेत असे वाटत जाऊन काढतच राहिले. पाककृतींचे फोटो काढण्याव्यतिरिक्त मी बाहेर फिरायला जाताना कॅमेरा न्यायला सुरवात केली. इथे बाहेर फिरायला जाताना गाडी थांबवण्यासाठी एक 'विश्रांती थांबा' असतो, तिथले फोटो घ्यायला सुरवात केली. तिथे खूप सुंदर सुंदर फुले मिळायला लागली. हा नाद वाढतच गेला. तळ्यावरील बदकांचे, फुलांचे, सूर्यास्ताचे, रस्त्याचे, इतकेच काय समुद्रकिनारा, पानेफुले, आकाश, जे काही चांगले समोर येईल त्याचे फोटो काढत गेले. फोटो काढताना डिजिटल कॅमेऱ्याच्या मी प्रेमात पडले! नुसते क्लिक केले की हजारोंनी फोटो काढता येतात त्यामुळे थांबणे अजिबात नाही.







कॅनन पॉवरशॉटने एकदा डिजिटल विडिओ क्लिप घेतली व त्यानंतर माझे अनेक फोटोंप्रमाणेच अनेक विडिओक्लिप्स घेणे सुरू झाले. विडिओमध्ये मी माझी गाण्याची आवड पूर्ण केली. एकेक गाणे रेकॉर्ड करून ते युट्यूबवर चढवायला सुरवात केले. त्याचप्रमाणे तळ्यावरील बदके, सीगल पक्षी, कासवे, बदकपिल्ले यांना ब्रेड खायला घालून त्यांचे चित्रण करत गेले. अनेक प्रकारच्या विडिओक्लिप्स चित्रित केल्या. बेडकांचे डरांव डरांव, पावसाचा आवाज, समुद्रावरील लाटा, नायगारा व इतर दुसरे धबधबे, पहाटेची पक्षांची किलबिल, नुकत्याच झालेल्या आयरीन वादळाचा आवाज, विमानाचा आवाज असे अनेक प्रकारचे चित्रण सुरू झाले.







पहिला घेतलेला कॅनन पॉवरशॉट कॅमेरा मी अगदी पहिल्यापासून सहजपणे हाताळत होते. त्याला विशेष काळजीपूर्वक जपत नव्हते. हा माझा कॅमेरा कुठेही पडलेला असे, कॉंप्युटर टेबलावर, टीपॉयवर, कधीकधी स्वयंपाकघरातल्या ओट्यावरही! रोज संध्याकाळी फिरायला जाताना आठवणीने कॅमेरा खिशात घेऊन मी जात असे, म्हणजे चालताना मध्ये वाटेत काही चांगले दिसले तर लगेच 'क्लिक' करता येई. मात्र जेव्हा कधी तो विसरत असे तेव्हाच नेमके काही चांगले निसटून जाई आणि तसे ते अजूनही होते! २०१० साली भारतभेटीला जाताना कॅमेरा घेतला व काही फोटो घेतले. ते फोटो म्हणजे जरा वेगळ्या प्रकारचे की जे नंतर बघतानाही कायम भारतभेटीची आठवण होत राहील. पुण्यात राहणाऱ्या माझ्या बहिणीकडे चिमण्या बऱ्याच येतात. ती त्यांना उरलेली पोळी तुकडे करून किंवा भात असे सर्व एका डब्यामध्ये घालून खिडकीत ठेवते आणि मग चिमण्या येऊन ते सर्व खातात. त्या चिमण्या इतक्या काही धीट होत्या की तिच्या डायनिंग टेबलवर येऊन बसायला लागल्या होत्या. हे ऐकल्यावर तर मला हर्षवायूच झाला. चिमणी मला खूपच आवडते. तिचा फोटो घ्यायला मिळणार ह्या आनंदात मी होते. कॅमेरा एका पिशवीत टाकला आणि निघणार तर अनवधानाने माझ्या हातून पिशवी पडली आणि 'टक' असा आवाज झाला. त्याक्षणीच कळाले की कॅमेरा तुटला! बघितले तर 'एलसीडी' ला चिरा पडल्या होत्या. त्यावेळेला मला खूप वाईट वाटले. हिरमोड झाला. डोळ्यांतून पाणी आले. तसाच मोडलेला कॅमेरा मी अमेरिकेत येताना घेऊन आले. नवीन कॅमेरा घेतला तोही कॅननचाच. मेगापिक्सेल जास्तीची घेतली. कॅमेऱ्याची इतकी सवय झाली होती की दुसरा घेईपर्यंत मला अजिबात चैन पडले नाही. दुसरा कॅमेरा वापरायला सुरूवात करताना भीतीच वाटली, आपल्या हातून परत पडला तर! मग मी माझ्या खूप जुन्या कॅमेराचे कव्हर वापरून नवा कॅमेरा त्यामध्ये ठेवायला सुरवात केली. मनाशी ठरवले की कोणतीही घाई-गडबड न करता सावकाशीने फोटो काढायचे. हा दुसरा कॅमेरा खूपच जपून वापरते. ठराविक ठिकाणी आठवणीने ठेवते.






पहिल्या कॅमेऱ्याने मी मनसोक्त फोटोग्राफी केली. त्यातले काही फोटो लक्षात राहण्यासारखे आहेत. ते फोटो बघितले की मला त्यासंदर्भातल्या आठवणी जाग्या होतात. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील राईट ब्रदर्स मेमोरियल बघण्यासाठी गेलो होतो, तिथे जाताना मोठमोठाले पूल लागतात, त्याचे फोटो छान आले आहेत. इथे जाताना युएस ६४ महामार्गावर एक विश्रांती थांबा आहे. तिथे मला एक छान फूल मिळाले. हिरव्यागार पानांमध्ये गुलाबासारखे दिसणारे एक गोंडस फूल! राईट ब्रदर्स मेमोरियल व आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो ते अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच होते. इथे मला समुद्रातून होणारा सूर्योदय पहायचा होता आणि फोटोही काढायचा होता. ही इच्छा पूर्ण झाली नाही कारण आभाळ ढगाळलेले होते. त्या समुद्रकिनाऱ्याचा फोटो मात्र अगदी आठवणीत राहण्यासारखा आला आहे. आकाश, समुद्र आणि जमिनीवरची वाळू असा एकसंध फोटो आला आहे. असाच दुसऱ्या एका समुद्रकिनाऱ्याचा फोटोही छान आला आहे. हा समुद्रकिनारा चित्रित करताना कॅमेरा मी एका विशिष्ट कोनात ठेवून क्लिक केला आणि फोटो मस्त आला.






बाहेर फिरायला जाताना रस्त्याच्या बाजूने पावसाचे पाणी जमा झाले होते व पाण्याच्या वर व खाली हिरवळ होती. त्याचा एक फोटो घेतला. त्या फोटोकडे पाहून तो आरसा आहे असे वाटते. फिरायला जाताना मध्ये वाटेत एक ओबडधोबड खडक आहे तिथे मी थोडी बसते. एकदा त्या खडकावर बसल्यावर खाली पाहिले तर वेलीसारखे दिसणारे एक रोपटे व त्यावर अधुनमधून पांढरी फुले होती. ते रोपटे तोडून त्या खडकावर ठेवले व त्याचा एक फोटो घेतला. हा फोटो पण खूप वेगळा आणि छान आला आहे. गवतफुलांपैकी पिवळी, पांढरी, लव्हेंडर रंगाची अतिशय नाजूक व छोटी फुले अप्रतिम आली आहेत! एका बदकपिल्लाचा फोटो पाहिला की त्याच्या डोळ्यातला निरागस भाव अगदी स्पष्टपणे दिसतो. आकाशातल्या ढगांचे भरपूर फोटो घेतले. त्यातला एका ढगाचा फोटो पिंजलेल्या कापसासारखा दिसतो. मुंग्यांचे वारूळ, पावसाळ्यात हिरवळीवर उगवलेल्या छत्र्या, झाडावर एकही पान नाही असे ओसाड झाड, सावल्या, आकाशात उडणारा पतंग, समुद्रकिनाऱ्यावरची वाळू, सफेद फेसाळणाऱ्या लाटा, शंखशिंपले, असे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फोटो काढले आहेत.







मला असाच सूर्याचा फोटो घ्यायचा होता, पण प्रखर सूर्याकडे पाहून फोटो नीट येईना, मग एकदा आकाश ढगाळले असताना त्यात सूर्य व्यवस्थित दिसत होता. सकाळचा चंद्र निळ्या निरभ्र आकाशात छान आला. तळ्यातील पाण्यात पडलेल्या आभाळाचे काही फोटो काढले. एकदा आकाशातील निळे रंग व आकाशात जमलेल्या काही ढगांचे प्रतिबिंब तळ्यातील पाण्यात खूप छान दिसत होते म्हणून तो एक फोटो काढला. एकदा हिमवृष्टी झाली असताना तळ्यावरील बर्फ गोठून स्फटिकाप्रमाणे पसरला होता तेव्हा त्यावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाशही खूप छान दिसत होता. असे दोन फोटो लक्षात राहिलेले आहेत. आमच्या शहरात क्वचितच हिमवृष्टी होते. मागच्या वर्षी झालेल्या हिमवृष्टीचे बरेच फोटो काढले. त्यात मी बर्फात केलेल्या कलाकुसरीचे फोटो छान आले. प्रत्यक्षापेक्षा फोटोमध्ये ही कलाकुसर अधिक छान दिसते! विमानातून जाताना काढलेले एक दोन फोटो चांगले आले आहेत. एकात विमानाच्या खिडकीतून खाली दिसणारी छोटी घरे व रस्ते छान आले आहेत आणि एकात काही ढग आणि निळेशार आकाश मस्त आले आहे. काही प्राण्यांचे व पक्ष्यांचे फोटोही असेच लक्षात राहिले आहेत. त्यातच एका मगरीचा फोटो आहे. आमच्या घरासमोरील येणाऱ्या बऱ्याच पक्ष्यांपैकी बगळा व करकोचा यांचे फोटो घेण्यात यश आले. एक भले मोठे कासव वावरत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त केले.







एकदा एक कोळी आमच्या गॅलरीत जाळे विणत होता त्याचाही फोटो स्पष्ट आला आहे. तसेच काही गवतफुले, रानटी झाडे अमाप वाढतात त्यात काही खूप सुंदर सुंदर फुले मिळाली. फॉल रंगांमध्येही काही पाने तर इतकी काही सुरेख दिसतात! इंद्रधनुष्याचे असेच दोन तीन फोटो घेतले त्यात एक अगदी लक्षात राहण्यासारखा आला आहे. आकाशात ढग होते, तसाच सूर्यप्रकाशही स्वच्छ होता. शिवाय आकाशात थोडे रंगही होते. या सर्वांमध्ये छोटेसे इंद्रधनुष्य छान दिसत होते. एकदा वसंत ऋतूतील नवीन फुटलेल्या पालवीचे फोटो काढले. काही झाडांचे फोटोही वेगळे मिळाले. त्यात उंच उंच झाडांची खोडे जमिनीवर पसरलेली होती. आमच्या घरासमोरील तळ्यावर अनेक सीगल पक्षी येतात. त्यात काही सीगल्स यांना हवेत उंच फेकलेला ब्रेड खायला जास्त आवडतो. हवेत फेकलेला ब्रेडचा तुकडा खाऊन परत दुसरीकडे उडत जाऊन एक चक्कर मारून येतात आणि परत ब्रेडचा फेकलेला तुकडा खातात. असे हवेत उडणारे काही सीगल पक्षांचे फोटो मला मिळून गेले. एका बदकपिल्लाचा हिरवळीतला फोटो छान आला आहे. बदकपिल्लू व त्याची बदकीण आई त्या पिल्लाच्या शेजारी उभी. जणू काही मायलेकी खास फोटोसाठीच उभ्या आहेत असे फोटो पाहताना वाटते. असे दोन फोटो लक्षात राहिले आहेत. एका विश्रांती थांब्यामध्ये फिक्या निळ्या रंगाची नाजूक फुले मिळून गेली. दोन तीन बागा पाहिल्या, त्यामध्ये काढलेला एक फोटो असाच वेगळा आहे. एका झाडाचे खोड कापलेले आहे आणि त्यामध्ये काही वेली उगवलेल्या आहेत, हा तो फोटो!









भारतातील काही फोटो ठरवून काढायचे मनात आहे. त्यामध्ये भाजीवाली, बर्फाचा गोळा, देवीच्या देवळातला गाभारा, बैलगाडी, मोकळा फलाट, काचेच्या बांगड्यांचे दुकान, झोपडी, नदी, ओढा, तुळशीबाग, प्राजक्ताचा सडा, असे बरेच काही! फोटोची कला म्हणा किंवा आवड म्हणा मला माझ्या बाबांकडून वारशाने आलेली आहे. माझ्या बाबांनी पण खूप फोटोग्राफी केली. त्यांच्याकडे कोडॅक कंपनीचा बॉक्स कॅमेरा होता. त्यांनी दोन तीन बॅगा भरून काढलेले सर्व फोटो पानशेतच्या पुरात वाहून गेले. त्यात त्यांनी डबल व ट्रिपल रोल फोटो काढले होते. डबल रोल फोटो असा होता की ज्यात त्यांचा भाचा लग्नामध्ये कोट घालून उभा आहे व तोच स्वत:ला आहेर देत आहे. ट्रिपल रोल मध्ये बाबा मध्ये उभे आहेत व डावीकडे व उजवीकडे बाबाच उभे राहून मधल्या बाबांना मारत आहेत असा एक फोटो होता. फोटोंच्या संदर्भात फोनवरून बोलताना त्यांनी सांगितले की पूर्वीचे कॅमेरे अनलॉक असल्याने असे फोटो काढता यायचे. डबलरोल फोटो काढताना अर्ध्या लेन्सवर वर्तमानपत्राचा कागद ठेवून एक फोटो काढायचा आणि दुसरा फोटो दुसऱ्या उरलेल्या अर्ध्या लेन्सवर कागद ठेवून काढायचा की डबलरोल फोटो येतो.








माझ्या दुसऱ्या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य असे की या कॅमेऱ्याने भरपूर फुले चित्रित झाली. माझ्याकडे सर्व प्रकारांच्या, आकारांच्या, रंगांच्या २०० ते ३०० सुंदर सुंदर फुलांचे फोटो आहेत. असे वाटते की या सर्व फुलांच्या फोटोंची प्रिंट काढावी व फुलांच्या फोटोंचे एक छोटे प्रदर्शन भरवावे. मी जेव्हा पहिल्या कॅमेऱ्याने काढलेले फोटो बघते तेव्हा असे वाटते की पहिला कॅमेराच जास्त छान होता. पहिले प्रेम आपण कधीच विसरत नाही ना! आता तर माझी नजरच एक कॅमेरा बनून गेली आहे! तरीही अजून रात्रीचे फोटो काढून झालेले नाहीत. शिवाय कृत्रिम प्रकाशामध्ये घरातले फोटोही काढून झालेले नाहीत. कॅमेराबद्दल मला तांत्रिक माहितीही नाही. मला फक्त "क्लिक"कसे करायचे त्याची माहिती आहे! या लेखात ज्या फोटोंचे वर्णन केले आहे ते सर्व फोटो देत आहे. बाकी सर्व फोटोंसाठी माझ्या "स्मृती" नावाच्या ब्लॉगला भेट द्या. तसेच विडिओ क्लिप बघण्यासाठी माझा युट्युबवरील चॅनल बघा. दुवे या लेखाच्या शेवटी देत आहे.









२००१ साली फोटोग्राफीला सुरवात केली तेव्हा मला माहित नव्हते की मला फोटोग्राफीचा छंद जडेल! हा छंद म्हणजे नुसता छंद नाही तर मनाला वेडापिसा बनवणारा छंद आहे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते "हा छंद जिवाला लावी पिसे!!! "

स्मृति ब्लॉग दुवा : http://www.rvgore.blogspot.com/

युट्यूब चॅनल दुवा : http://www.youtube.com/user/rohinigore

4 comments:

  1. ताई फोन्ट जरा मोठा ठेवा म्हणजे वाचन सुलभ होईल.

    ReplyDelete
  2. okay ! thanks for comment

    ReplyDelete
  3. sundar oghavte likhan
    tujha chhand kharokharch ved lavnara aahe

    ReplyDelete
  4. Thanks so much Dipti !! :)

    ReplyDelete