आज सकाळी उठल्यावर आज लायब्ररीत जायचे ठरवले होते. आजकाल मी आठवड्यातून २ ते ३ वेळा लायब्ररीत जाते. खरे तर रोजच्या रोज जायचेच मनात आहे पण ते शक्य होतेच असे नाही कारण हवा नेहमी बदलती असते. कधी थंडी तर कधी पाऊस नाहीतर रणरणते उन.
अर्थात नोकरी असली की कोणतेही हवामान असो जावेच लागते. मी लायब्ररीत voluntary work करायला जाते त्यामुळे बंधन नाही. काही वेळा काम न करता असेच काही वाचत बसते. आईला साधारण एक दिवसा आड फोन असतोच. आज आईला फोन केला आणि एक वाईट बातमी कळाली. पूर्वी आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. एक आजी होती. तिला ३ मुले व २ मुली. सर्वात मोठा मुलगा त्याला आम्ही काका म्हणायचो व त्याच्या बायकोला मामी. तर ही मामी गेल्याची बातमी मला आईने दिली आणि मला खूपच वाईट वाटले. माझ्या लहानपणी बघितलेली ही मामी मला खूपच आवडायची. ती पावडर कुंकू करताना नेहमी आधी विको टरमरीक लावायची. गंध मरून रंगाचे आणि खूप बारीक.
तिला काकू अशी हाक आम्ही कधी मारली नाही इतकी ती गोड होती. गालावर नेहमी हासली की खळ्या पडणार. मी ८ वी किंवा ९ वीत असेन. ही मामी मला नेहमी "तेरे मेरे सपने" मधली गाणी म्हणायला सांगायची. तिला पहिला मुलगा झाला. तिची सासू म्हणजे आमची मानलेली आजी तिला त्रास द्यायची. मग ती आमच्याकडे येवून माझ्या आईकडे मन मोकळे करायची. दुसरी मुलगी झाली तेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिला पहायला. आम्ही मामीला विचारले की मुलीचे नाव काय ठेवणार आहेस तर म्हणाली तुम्हीच सुचवा काहीतरी. म अक्षरावरून ठेवा. कारण की पहिला मुलगा मंदार म्हणून मुलीचे नाव म अक्षरावरून. आम्हा दोघी बहिणींना मंजिरी हे नाव खूप आवडायचे. अजूनही आवडते. मामीला हे नाव सुचवले व तिने मुलीचे नाव मंजिरीच ठेवले. वर्णाने सावळी, बोलके डोळे, बांध्याने मजबूत, खूप छान छान साड्या नेसायची. माहेरची खूप श्रीमंत तरी श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. संसाराला खूप चांगली. नीटनेटकी, घर अत्यंत सुरेख ठेवणारी. तिचे ठाण्याच्या घरी आम्ही एकदा गेलो होतो. तिने खूप छान आदरातिथ्य केले. तिचा व आमचा सहवास खूप कमी होता. कारण की ती दुसरी मुलगी झाल्यावर दुसऱ्या गावी निघून गेली बदलीवर.
आज ही बातमी ऐकली आणि खूप रडू आले. तिचे व्यक्तिमत्व मला खूपच आवडायचे. आज सबंध दिवस तिच्याच आठवणीत गेला. तिच्याबद्दल मी ज्या काही चार ओळी लिहिल्या आहेत ती एक प्रकारची माझ्यातर्फे तिला श्रद्धांजली आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना. मामी माझ्या कायम आठवणीत राहिली आहे आणि राहील.
अमेरिकेत राहून सुद्धा एवढं संवेदनशील मन !
ReplyDeleteछान वाटलं.
..ममंगलसिंग धनावत, जालना , महाराष्ट्र.
ममंगलसिंग धनावट,, तुमचे सर्व अभिप्राय मला खूप खूप आवडले. धन्यवाद !!! उत्साह आला !!
ReplyDelete