क्लेम्सन शहराचे मी खूप कौतुक केले. तिथले दिवस, तिथल्या आठवणी व अनुभव, निसर्गरम्य परिसर. क्लेम्सनमध्ये साधारण तीन ते चार वर्षे राहत असल्यामुळे तिथल्या वेगवेगळ्या आठवणी व अनुभवांचे फोटो व त्यांचे लेखन असे सर्व काही झाले. डेंटन शहराचे दिवसही असेच छान होते! डेंटन शहरातील काळ अवघा एक वर्षाचा होता म्हणून शीर्षक दिले आहे "डेंटनचे दिवस! "
दहा वर्षांपूर्वी अमेरिकेची ओळख डेंटन शहरात झाली. अमेरिकेचे पहिले दर्शन जे डेंटन शहरात झाले ते खूप सुखद होते. जेव्हा आम्ही आमच्या अपार्टमेंट मध्ये रहायला गेलो तेव्हा आमच्या घराच्या खाली राहत असलेली प्रविणा वर आली व तिने आमची ओळख करून घेतली. सत्या आमच्या शेजारी राहत होती. तिने तर आम्ही रहायला गेल्यावर "आज तू घरी काहीही बनवू नकोस. तुम्ही आमच्या घरी जेवायला या" असे आमंत्रण दिले. डेंटन शहरात जे मित्रमैत्रिणी मिळाले ते सर्व अमेरिकेत नवीनच होते.
डेंटन शरामध्ये ओळख झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये जाणेयेणे होते, गप्पा टप्पा होत होत्या. कार असल्या तरी सर्व जण विद्यापीठात चालत जायचो. आठवड्याची ग्रोसरी करण्याकरता आम्ही सर्व मिळून एकत्र चालत जायचो. शुक्रवार हा आमच्या सर्वांचा "ग्रोसरी वार" होता. आमच्या शेजारच्या घरात राहणारी सत्या व तिची फॅमिली महिन्याभरानंतर दुसऱ्या शहरात गेली. तिला आम्ही दोघींनी वेगवेगळे जेवायला बोलावले. शिवाय एक एकत्र जेवणही केले. तेव्हा फक्त आम्ही तिघी होतो. मी, सत्या व प्रविणा. जाताना तिला बायबाय केले. ग्रुप फोटो घेतले. आमच्या शेजारी एक बांगलादेशी जोडपे राहत होते. नवरा पिएचडी करत होता व ती मॉलमध्ये कामाला जायची ते रात्री ९ ला यायची.
ती एकदा तिच्या गावी महिनाभर गेली होती. जाताना तिने आम्हाला तिचा टु इन वन दिला व म्हणाली आम्ही येई तोवर हा तुझ्याचकडे राहू दे. रेडिओवर २४ तास हिंदी गाणी लागतात. डॅलसवरून रेडिओवर २४ तास हिंदी गाणी लागायची. नंतर आम्ही पण एक टु इन वन घेतला. माझी अगदी पहिल्यापासूनची सवय आहे. मला टु इन वन खूप आवडतो. घरातले काम करत असताना एकीकडे रेडिओ मला सतत लागतो. डॅलसवरून रेडिओवर लागणारी ती २४ तास जुनी हिंदी गाणी म्हणजे माझ्याकरता तर "मेजवानी" होती!
विनायक विद्यापीठात post- doctorate करण्याकरता आला होता त्यामुळे लॅबमध्ये दिवस रात्र काम! तसे तर डेंटन मधली आमची छोटी post-doc community खूप छान होती. एकोपा होता. आम्हाला कधिही "आपण एकटे आहोत" असे जाणवले नाही. डेंटनमध्ये आलो तेव्हा वसंत ऋतू संपत आलेला होता. खूप स्वच्छ सुंदर हवा! मला अजुनही आठवत आहे. फॉलमधले सैरावैरा वाहत असलेले बोचरे वारे, लखलखणाऱ्या व कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस! व थंडीचा कडाका! त्यात भर म्हणजे मनमिळाऊ मित्रमैत्रिणी, सारे कसे छान छान. कोणताही पहिला आलेला अनुभव आपण कधीच विसरत नाही! बरोबर ना!
No comments:
Post a Comment