Wednesday, April 13, 2011

दिनांक १३ एप्रिल २०११

आज सकाळी खूप थंडी होती, उठवत नव्हते, पण उठायला हवेच ना! चहा पिऊन नेटवर थोड्या टिचक्या मारल्या. आज भारतात दोन मैत्रिणींना फोन लावला पण बिझी टोन होता.



थोड्यावेळाने बंगलोरमध्ये राहत असलेल्या मैत्रिणीला फोन केला. दीड दोन तास गप्पा मारल्या. खूप छान वाटले. तिच्या व माझी कॉमन मैत्रिण मागच्या आठवड्यात तिच्याकडे आली होती. ती म्हणाली हम दोनोने मिलके तुझे बहुत याद किया. कैसी है वो ऐसा पूछ रही थी. उसको इधर बंगलोरमें आने के लिए बोल दे उसका फोन आया तो. माझ्या मैत्रिणीने तिला सांगितले की मी फेसबुकवर असते तर म्हणाली शोधीन आता तिला. मग मीच एकीकडे फोनवर बोलता बोलता तिला शोधले आणि सांगितले मला मिळाली ती.



स्वयंपाक करता करता साऊथ आफ्रिकेतील मैत्रिणी बोलायला आली. आज चक्क तिचे गुगल टॉक नीट चालत होते त्यामुळे बोलता आले. तिला म्हणाले किती दिवसांनी तुझा आवाज ऐकत आहे. आवाजाला बघ किती महत्त्व आहेत ते! अगदी भेटल्यासारखे वाटले. तिने मला व्हेजिटेबल सूपची कृती सांगितली.



आज ग्रंथालयात जायचा वार होता. सकाळची थंडी गायब होऊन प्रखर उन पडले होते. जावे का नाही असा विचार करता करता शेवटी जायचे ठरवले. कारण आज हवा चांगली आहे तर बाहेर पडून घ्या. ग्रंथालयातून बाहेर पडल्यावर माझी आजुबाजूला थोडी चक्कर असते. आज पाहिले तर वा! गुलाबांच्या झाडाला प्रचंड फुले होती. काही पूर्ण उमललेली, तर काही अर्धवट उमललेली, तर काही अजून कळ्यांच्या रूपात होती. मनसोक्त फोटो घेतले. ग्रंथालयातून येता येता प्रचंड डोके दुखायला लागले. खूप रणरणते उन डोळ्यांना त्रास देत होते. आल्यावर चहा घेतला व पटकन होणारी उकड खायला केली. डोके बांधून थोडावेळ पडले होते. आजचा दिवस छान गेला. मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा आणि भरपूर गुलाबकळ्या पाहता आल्या!

2 comments:

  1. आता गुलाबकळ्यांचे फोटोज टाक लवकर..उत्सुक आहे बघायला..:)

    ReplyDelete