Friday, April 08, 2011

नदीकाठी





श्रावण लागला होता. मृग, आद्रा नक्षत्रे पडून गेली होती. पुनर्वसू नक्षत्राचा प्रथम चरण, असळका, सूना, उनाड पोरींचे पावसाचे फेर सुरू झाले. कधी नदी काठी तर लगेच आंबराईत सरी येत होत्या. फणसाची, आंब्याची पाने पाण्याने भिजत आहेत तोच ढगातून, उन्हाच्या तिरसस लहरी दिसत. झाडावरून कावळे, साळूंख्याचे थवे भिजले पंख फडफडत इकडून तिकडे झाडावर झेपावत आहेत. क्षणाक्षणाला मन भिजत आहे तर कधी ढगांनी आकाश आच्छादून जात आहे. अशा उबदार वातावरणात नदीकाठी फिरण्यात खरच मौज असते. नदीकाठानं फिरत फिरत मी विठ्ठलवाडीच्या देवळापाशी नदी किनारी उतरलो. पाण्याने वेढलेल्या पुंडलीकाच्या देवळापाशी आलो व तेथील फरसबंदी कट्यावर पाय ठेवला. फात होतो, देवळाजवळील लहान घाटाला पाणी थडकत होते. गढूळ पाण्याबरोबर फुलं, निर्माल्य, केळी करदळीची पाने वाहत येत होती व लहानश्या भोवऱ्यात सापडून पुढे जात. पलीकडील काठावरच्या मळ्या हिरव्या गार दिसत होत्या. साळीची राने वाऱ्यावर झुलत आहेत. दूरवर उसाचे मळे व त्याजवळील गावाची वस्ती, माणसांची व जनावरांची ये-जा दिसत होती.



दुर्बीण डोळ्याला लावली तशी गवतातून गावाकडे जाणारी पायवाट व गाव स्पष्ट दिसले. कापलेल्या गवताचा भारा झाडाजवळ ठेवून, हातावर तंबाखू मळत असलेला माळी व त्याच्या जवळ बसलेली त्याची बायको व मुले दिसत होती. वडावर आंब्यावर बगळे उतरत होते. या दिवसात नदीकाठी हरतऱ्हेच्या वनस्पती उगवून येतात. काठावरच्या चिखलातील खेकडे बिळातून तिरके तिरके चालत बाहेर येत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवून बगळे धोबीपक्षी त्यांना उचलत होते. क्वचित एखादी पाणकोंबडी गवतातून फडफडत बाहेर येताना दिसत होती. काठावरील कडू कारंज्याच्या झाडाचे डोलारे नदीवर सावल्या टाकत होते. एका फांदीवर खंड्या बसलेला दिसला. मि त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत होतो, इतक्यात सूर मारून त्याने पाण्यातील मासोळी उचलली व एक गिरकी घेऊन पंख फडफडत त्याने फांदी गाठली व लचके तोडून मासोळी फस्त केली, आणि पुन्हा फांदीवर चोच घासून सावजावर लक्ष ठेवत, निळे पंख हलवत स्वारी स्वस्त बसली. वाऱ्याच्या झोताने, फांदीसह खंड्या झोके घेत होता. दुर्भिण फिरवली तशी खडकावर काही बायका कापड धूताना दिसल्या. त्यांच्या जवळच खुरमांडी घालून दोन पोरे पाण्यात गळ टाकून मासा लागतो का ते न्याहाळीत होती. त्यातच खडकावरून उड्या मारत मारत दोन टिटव्या "टिवटिव टिवटिव" आवाज करत आकाशत भरारल्या.


लेखक : श्री निळकंठ बाळकृष्ण घाटे (माझे वडिल)

2 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

कधीतरी स्वत:च्या कामांमधून वेळ काढून अशा घडामोडी पहाणे खूप आल्हाददायक असते. मीही असा अनुभव घेतला आहे.

rohinivinayak said...

Dhanyawaad!