Saturday, December 04, 2010

आठवणींच्या हिंदोळ्यावर ...(४)

दिनांक २० ऑक्टोबर.. २०१०

तुम मुझे युँ भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगी गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे, हा तुम मुझे युँ... आठवणींबरोबर हे गाणे पण ओठांवर आले आहे. आठवणींची प्रचंड गर्दी उसळली आहे. असे वाटत आहे की आत्ता उठावे आणि क्लेम्सनला जावे. सगळे कसे अगदी डोळे भरून परत पाहावेसे वाटत आहे. विद्यापीठ, ग्रंथालय, एकार्ड, पोस्ट ऑफिस, बसस्टॉप, उंचसखल वळणे घेत जाणारे रस्ते, केमिस्ट्री लॅब. मनाने मी क्लेम्सनला जाऊन पोहोचले आहे. प्रत्यक्षात जाईन तेव्हा भरपूर फोटो काढणार आहे. क्लेम्सनच्या काही आठवणी मी या आधीच लिहिल्या आहेत त्याला आता क्लेम्सनच्या आठवणी असे लेबल देणार आहे. त्या आठवणी आहेत अनुक्रमे कॅट बस, इंग्रजीचा वर्ग, अमेरिकेतील पाळणाघर, केट व मॅगी, मॉप्स, एक सुखद आठवण. यात अजून एक भर पडेल ती "खेड्यामधले घर कौलारू" याची. अजून २-३ लेख लिहायचे आहेत पण त्याची अजून शीर्षके ठरलेली नाहीत.





त्याचे असे झाले की फेसबुकवर मित्रमंडळाची संख्या ९९ झाली होती. शंभरावे कोण यामध्ये फेसबुकवर काही नावे शोधली पण एकाच नावाचे बरेच जण अशी यादी आली त्यातले नक्की कोण? शोधता शोधता ध्यानी मनी नसताना माझ्या मावसपुतणीचे नाव लिहिले आणि ती यादीत पहिलीच दिसली आणि मी पाहतच राहिले! तिला मी २००८ च्या भारतभेटीमध्ये पाहिले होते त्यामुळे चेहरा लक्षात होता. माहिती वाचली आणि हीच ती! याची खात्री झाल्यावर तिला मैत्रीण विनंती पाठवली. त्याचबरोबर मला अजूनही या गोष्टीचा आनंद झाला की ती क्लेम्सनला आहे याचा. एक दोन तासाच फोनाफोनी, संगणकावर बोलणे पाहणे झाले. पुतणीलाही आमच्या इतकाच आनंद झाला होता.





संध्याकाळपासून क्लेम्सनच्या आठवणी इतक्या काही दाटून आल्या की कागदावर उतरवल्याच पाहिजेत त्याशिवाय झोप येणे शक्य नाही म्हणून झोपायच्या आधी वहीत खरडल्या आणि लगेच संगणकावर टंकतही आहे! क्लेम्सनला पहिल्याप्रथम एका मित्राकडे काही दिवस राहून क्लेम्सन प्लेस अपार्टमेंटमध्ये ३ महिन्यांकरता राहिलो. ही जागा मुख्य रस्त्यावरून बरीच आत होती. खूपच छान होती ही अपार्टमेंटस, टुमदार! क्लेम्सनमध्ये रस्ते सरळ नाहीत, उंचसखल आहेत. सुरवातीला कार नसल्याने मी आठवड्याची कामे अशी काही आखली होती की त्यात माझा वेळही जाईल व कामेही होतील. यात मी एकार्ड मधून दूध आणायचे. एकार्डच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे एकदम चकाचक! इथे मी पत्र टाकायला यायचे. कॅट बसचा स्टॉप शोधण्यात पण मी वेळ घालवला आहे. क्लेम्सन प्लेसच्या जागेत भरपूर टीव्ही पाहणात वेळ घालवला आहे. टाइम मॅगझीन वाचण्यात वेळ घालवला आहे. बरेच वेळा जे काही सुचेल ते भराभर वहीत उतरवायचे. असे बरेच लिखाण केले आहे ते सर्व लिखाण मी जेव्हा लिहायला सुरवात केली त्यावेळेला कामी आले. त्यावेळचे सर्व लिखाण असंबद्ध होते ते नंतर मी सुसंबद्ध केले.





त्याच शहरात दुसऱ्या जागेत राहिल्या आल्यावर सकाळचा पोळी भाजीचा डबा झाला की बाहेरच्या लाकडी ओंडक्यावर येऊन बसायचे. गार हवा यायची. सगळीकडे हिरवी गार झाडेच झाडे आहेत क्लेम्सनला. जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे तिथे सर्व हिरवेगार! सकाळी उठायला उशीर झाला की विनायकला पोळीभाजीचा डबा द्यायला जायचे बसने लॅबमध्ये. तिथे सर्वांना हाय हॅलो करून दुसऱ्या बसने घरी परत. विद्यापीठासमोर जो बसस्टॉप आहे लागूनच थोडे उंच चढण आहे तिथे काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवर बसायचे मी बस येईपर्यंत. बरेच जण असे बसायचे तिथे पायऱ्यांवर. थंडी असेल तर कोट मफलर घालून. रणरणते ऊन असेल तर टोप्या घालून. सुरवातीला वेळ जावा म्हणून बसने भरपूर हिंडलेली आहे. वेळापत्रक बरोबर घ्यायचे. शिवाय पाणी पिण्याची बाटली, टोपी, छत्री घेऊन निघायचे मी. दुकानात जाऊन सावकाशीने रमत गमत त्या दुकानात काय काय आहे ते बघायचे. काही वेळा काही खरेदी करायचे. भूक लागली तर बटाटा चिप्स व किटकॅट विकत घ्यायचे. बसस्टॉपवर बसची वाट पाहत खायचे. वर थोडे पाणी प्यायचे. काही दिवसांनी मित्रमंडळ जमा झाले. एकमेकांकडे जाणे येणे सुरू झाले, जेवणे सुरू झाली. शनिवारी रात्री एकमेकांकडे जाऊन निवांत गप्पा टप्पा, नंतर गरमागरम चहा ठरलेले. बरेच वेळा सगळ्यांनी मिळून तिथल्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायचो. इथले चित्रपटगृह पण मला खूप आवडले. नंतर काही दिवसांनी मला नोकरी लागली.





साधारण दोन ते अडीच वर्षांचा काळ होता क्लेम्सनमध्ये. त्यानंतर एक्झीट घेतली ती विल्मिंगटन शहराची. क्लेम्सनच्या आठवणी खूप खूप छान आहेत! विसरणे शक्यच नाही. आपल्या आयुष्यात काही काही आठवणी खूपच रमणीय असतात त्यापैकी ही एक आठवण क्लेम्सन, साऊथ कॅरोलायनाची!.......................






.....................दिनांक २० ऑक्टोबरनंतरही क्लेम्सनच्या आठवणी मनात धावत पळत होत्या. शनिवार रविवार धरून चार दिवसांची सुट्टी जवळ येऊन ठेपली होती म्हणून लगेचच क्लेम्सनला जाण्याचे ठरवले. आनंदी मनालाही थोडा आवर घातला कारण की खूप आनंदाचा हिरमोड होऊ शकतो याची एक झलक नुकतीच अनुभवली होती. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील पर्वतरांगा पाहायच्या राहिल्या होत्या. विनायकच्या मित्राने सहज विचारले "आम्ही जात आहोत, तुम्ही येत आहात का? " मी लगेचच "होऽऽऽ" म्हणाले. त्या दिवशी रात्री अशीच खूपच आनंदात होते. कॅमेऱ्यात पानगळीचे रंग साठवण्याची उत्तम संधी होती. त्यादिवशी रात्रभर डोळ्यासमोर अनेक रंग दिसत होते. नारिंगी, लाल, चॉकलेटी, पिवळा, हिरवा, खूप खूप रंग! मी या सर्व रंगीबेरंगी पानांचे भरपूर फोटो काढत आहे अशी कल्पनाचित्रे रंगवत होते. पण..... दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात उंच उंच पर्वतांवर पोहोचल्यावर चांगलाच हिरमोड झाला होता!






गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबराला सकाळी क्लेम्सनला जाण्याकरता कार सुरू केली. मागच्या वेळी यूएस ७६ रस्ता घेतला गेला नव्हता तो यावेळी घेण्याचे ठरवले. यूएस ७४/७६ बराच वेळ एकत्र धावतात व नंतर एके ठिकाणी ७६ चा फाटा कधी पटकन फुटतो कळत नाही. यूएस ७६ खूप छान होता. इथे तर पानगळीचे रंग खूपच छान दिसत होते. रस्त्याच्या आजूबाजूला झाडे व त्याखाली वाळलेल्या पानांचे रंगीबेरंगी सडे खूपच छान दिसत होते! बराच पल्ला गाठल्यावर शेवटी क्लेम्सन शहराकडे जाणारी १९ ब ची एक्झीट घेतली आणि मन एकदम ताजेतवाने झाले. काही वेळाने आठवणींना उजाळा मिळत गेला ते अगदी परतीचा प्रवास केल्यावरच थांबला. पूर्वी क्लेम्सन शहराजवळ असणाऱ्या अँडरसन नावाच्या शहरात आम्ही वॉल मार्ट दुकानात जायचो तो रस्ता आठवला, ते सिग्नल्स आठवले. कार कॉलेज ऍव्हेन्युला जेव्हा आली तेव्हा तर आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.








कॉलेज ऍव्हेन्यू रस्ता तर आमच्या दोघांच्याही खूप आवडीचा आहे. या रस्त्यावरून चालताना खूप प्रसन्न वाटते. कॉलेज ऍव्हेन्यू ८०८/८ इथल्या अपार्टमेंटमध्ये आम्ही राहायचो. घरापासून डाऊन टाऊनपर्यंत रोज एक चक्कर सहज व्हायची. माझी पहिली नोकरी चर्चमधली रविवारी सकाळी ८ ते १२ होती. तिथे मी चालत जायचे. खूप कुडकुडत्या थंडीत जाकीट, मफलर, कोट, हातमोजे, पायमोजे, बूट असा सर्व जामानिमा करून चालायला सुरवात करायचे ते २० मिनिटात चर्चमध्ये यायचे. ऐन थंडीत मायनस सेल्सिअसमध्ये तापमान असायचे. नाका तोंडातून वाफा यायच्या. स्वच्छ सुंदर हवा, कोवळी उन्हे! खूप प्रसन्न वाटायचे. रस्त्यावरून एखादे वाहन किंवा २-३ जण असेच चालणारे. बाकी सर्व रस्ता निर्मनुष्य. नोकरी लागण्याच्या आधी रोज संध्याकाळी डाऊनटाऊन पर्यंत चक्कर असायची. या रस्त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ असल्याने चालणेही सुरक्षित होते.







आमच्या पुतणीला भेटून हॉटेलमध्ये गेलो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी क्लेम्सनला हजर झालो. संध्याकाळी मी व विनायकने चालत चालत बरेचसे क्लेम्सन बघितले. एकेक करत सर्व आठवत होते आणि खूप छान वाटत होते. एकीकडे फोटो काढणे चालू होते. ८०८ कॉलेज ऍव्हेन्युच्या आधी आम्ही क्लेम्सन प्लेस मध्ये ३ महिने राहिलो होतो. ती अपार्टमेंट्स बघितली. रात्री तिथल्या उंचसखल रस्त्यावरून येताना कशी भीती वाटायची तेही आठवले. रात्री ठप्प अंधार आणि खूप शांतता असे. तसे हे अपार्टमेंट मुख्य रस्त्याच्या खूप आत होते त्यामुळे जास्त वर्दळ नव्हती. क्लेम्सनमध्ये सर्व रस्ते उंचसखल आहेत त्यामुळे चालताना छान व्यायाम होतो. आम्ही तब्बल ३ तास चालत होतो. चालणे अजिबात कंटाळवाणे नाही. खूप आनंद देणारे आणि आठवणींना उजाळा देणारे होते.








विद्यापीठ परिसर, तिथला कॅफे, ग्रंथालय,कॉलेज अव्हेन्यू वरील ऍस्ट्रो चित्रपटगृह, डाऊनटाऊन, पोस्ट ऑफिस, वाकोविया बँक सर्व काही डोळे भरून बघत होतो. क्लेम्सनला आल्यावर सुरवातीला कोणाच्या ओळखी नसल्याने काही दिवस मी दर आठवड्याला एक पत्र लिहून ते पोस्ट ऑफिसामध्ये टाकण्यासाठी यायचे. सुरवातीच्या काळात मी बरीच पत्रे भारतात पाठवली आहेत त्यामुळे तिथले लोक ओळखीचे झाले होते. मला पाहिल्यावर लगेच हसून "इंडिया लेटर!" असे म्हणायचे. वाकोविया बँकेत मी मला नोकरीवर मिळालेले चेक भरायला यायचे. इथले छोटे पोस्ट ऑफिस व बँक मला खूप आवडायचे. माझ्या कमाईचे चेक भरताना मला खूप छान वाटायचे. ख्रिसमसच्या सुट्टीत ऍस्ट्रो चित्रपटगृहात १ डॉलर मध्ये बरेच चित्रपट आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी मिळून बघितले आहेत. खूप मजा यायची. आम्ही जिथे राहत होतो त्या घराजवळच रेल्वे स्टेशन आहे ते तिथे असताना कधी बघितले नव्हते म्हणून तेही बघितले. इथे प्लॅटफॉर्म वगैरे नाही. त्या छोट्या स्टेशनामधून फाटक उघडेच असते त्यासमोर रेल्वेचे रूळ दिसतात. आम्ही गेलो तेव्हा क्लेम्सनला फुटबॉल मॅच होती त्यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते तेही बघायला मिळाले. कॅट बस चार दिवसांची मोठी सुट्टी असल्याने बंद होती पण एका बसचे दर्शन झाले. अगदी लगेचच एक फोटो काढला. जिथे जिथे जात होते तिथले सर्व फोटोज काढले. विद्यापीठात एक पिवळ्या पानांचा सडा घालणारे झाड आहे ते पाहिल्यावर हेच झाड आपण पूर्वी विद्यापीठात जाता येता कसे पाहायचो तेही आठवले.









दुसऱ्या दिवशी मी एका मैत्रिणीकडे पूर्वी डोंगरावरून चालत जायचे तिथे कारने गेलो. वाळलेल्या पानांचा खूप मोठा पसारा झाला होता. त्या डोंगरावरच्या भुलभुलैयात तिचे पूर्वीचे घर काही सापडले नाही. पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा चालत गेले पाहिजे. चर्चमध्ये इंग्रजीचा वर्ग घेणारी कॅथलीन हिला तिच्या घरी जाऊन भेटलो. तिलाही खूप आनंद झाला. कॅथलीन ८४ वर्षाची आहे. ती अजूनही चर्चमध्ये इंग्रजीचे वर्ग चालवते. विद्यापीठात शिकणारे इतर देशातील विद्यार्थी ज्यांची लग्ने झालेली आहेत त्यांच्या बायका या इंग्रजी वर्गाला येत असत. मी व माझी एक श्रीलंकन मैत्रीण आम्ही दोघी तिथे इंग्रजी शिकायला येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळायचो. त्यावेळेला डिपेंडंट व्हिसावर वर्क परमिट होते म्हणून मी चर्चमधल्या छोट्यामोठ्या २-३ नोकऱ्या करायचे. सोमवार ते शुक्रवार १० ते ४, रविवारी सकाळी ८ ते १२, बुधवारी व शुक्रवारी संध्याकाळी ६ ते ८ याप्रमाणे. क्लेम्सनला २००२ मे ते २००५ जानेवारीपर्यंत होतो. जवळजवळ ६ वर्षांनी क्लेम्सनला परत जाण्याचा योग जुळून आला. अगदी थोडे बदल सोडल्यास क्लेम्सन जसेच्या तसेच आहे. आय. आय. टी पवई सारखीच ही क्लेम्सनची आठवण अविस्मरणीय आहे.






माझ्या आयुष्यात काही काही आठवणी अविस्मरणीय आहेत त्यामुळेच सारखे सारखे म्हणावेसे वाटते या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

2 comments:

mau said...

khup chhan lihile aahes..kaahi jaga aapalyaa manat ghar karun jaataat...sundar lihiles..

Nisha said...

Kiti sundar lihilay rohini tai - farach chan :)