आजचा दिवस वेगळा आणि छान होता. विनायकच्या कंपनीमध्ये एक तेलुगु आहे. त्याची दुसरी मुलगी आज १ वर्षाची झाली म्हणून आम्हाला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. मागच्या आठवड्यात पण १ वर्षाच्या मुलाच्या पार्टीला गेलो होतो. इजा बिजा झाले आणि आता तिजाही होईल असे वाटते. पार्टीत बरेच जण होते. नवरा बायको आणि त्यांची मुले असे मिळून ३० तरी असतील. कंपनीतले अजून ४ जण होते. पार्टीत अजिबात औपचारिकता नव्हती ते मला जास्त आवडले. खूप झगमगाटही नव्हता. जिचा वाढदिवस होता ती, तिची मोठी बहिण आणि आई एकाच रंगाच्या ड्रेस मध्ये होत्या. तिचींचेही घोळदार झगे चमकत होते. राणी आणि नारिंगी रंग एकत्र होता. बाह्या उडत्या होत्या. त्यांच्या घराच्या बाहेरच्या बाजूला हिरवळीवर ही पार्टी होती. सगळे गप्पा टप्पा करत होते. लहान मुले हलकासा दंगा करत होती. मित्राची जी मोठी मुलगी आहे तिने माझी गिफ्ट डेकोरेशन केले होते तिथे नेऊन ठेवली. फोटोसेशन खूपच झाले. केक कापला आणि सर्वांनी आपापले जेवण कागदी डिश मध्ये घेऊन परत गप्पांमधे रंगून गेली.
Sunday, August 11, 2024
११ ऑगस्ट २०२४
या पार्टीचे विशेष म्हणजे सगळा स्वयंपाक घरी बनवलेला होता आणि तो सुद्धा सर्व पुरुषांनी मिळून. तेलुगू लोकांच्यात खूप एकी असते. विनायकचा मित्र म्हणाला आम्ही सकाळपासून सर्व पदार्थ बनवत आहोत. त्यांच्या घरी गेलो तेव्हा हॉल मध्ये बरेच फुगे होते. आधी हिरवळीवरच खुर्चीवर बसलो होतो. मित्र म्हणाला आत येऊन बसा. जेवणात चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, वाटाण्याची उसळ, एक पातळ भाजी, स्प्रिंग रोल, गुलाबजाम, दिंड ,(मित्राचा मित्र मला म्हणाला,, काकू हा गोड पदार्थ खा, हा फक्त साऊथ मध्येच मिळतो) जेवणात ताटात वाढून घेतला तर "अरे ही तर आपली दिंड आहे की" बटाटा आणि मिरची भजी, पोळ्या, मुलांसाठी बाकीचे रेडिमेड कप केक, पिझ्झा आणि कोक होता. आम्ही मुलीला भेटवस्तू दिली ती म्हणजे फ्रॉक आणि एक खेळणे. खेळणे म्हणजे एक बटण दाबले की वन टु थ्री फोर, दुसरे बटण दाबले ए बी सी डी, तिसरे दाबले की गाणी. लहान मुलांना अशी आवाज करणारी खेळणी खूप आवडतात. फ्रॉकच्या लांब बाहीला आणि खाली दोन्ही कडे झालर होती. हा फ्रॉक आम्हाला दोघांनाही आवडला. फ्रॉक जरा वाढीवच घेतला. या पार्टीत मला अजूनही एका गोष्टीचा आनंद झाला तो म्हणजे चंद्राचा फोटो घेता आला.
Rohini Gore