Thursday, November 28, 2013

भारतभेट २०१३

भली मोठी बॅग रिक्शातून खाली काढली. रिक्शावाल्याला पैसे दिले आणि वर पाहिले तर लाल चुटुक गुलाब वाऱ्यावर डोलत होता. एका कुंडीत भरगच्च शेवंतीही फुलली होती. लिफ्टने वर गेले आणि बेल वाजवली "टिंगटाँग" आईने दार उघडेच ठेवले होते. जाळीच्या दारातून आत पाहिले तर आई माझी आतुरतेने वाट पाहत कॉटवर बसलेली दिसली.




 
घरात शिरल्यावर बाबाही दिसले. बाबांनी विचारले "गुलाब पाहिलास का? " हो तर! गुलाबाने छानच स्वागत केले माझे! मी म्हणाले. बाल्कनीत गेले आणि एकेक फुलाकडे निरखून पाहिले. फुले खूपच गोड दिसत होती! बागेत नवीन पाहुणा आलेला दिसला आणि तो म्हणजे नारिंगी रंगाचा जास्वंद! इतका काही छान दिसत होता! आईने साबुदाणा भिजत घातला होता पण मी म्हणाले प्रवासात मी इडली चटणी खाल्ली आहे. संध्याकाळी करू खिचडी, आणि मी करते, माझ्या हातची खा!





 
श्री भिडे यांची १३ सीटरची गाडी पुणे डोंबिवली व डोंबिवली पुणे सकाळ संध्याकाळ धावते. त्यांच्यातर्फे मधल्या वाटेत खायला इडली चटणी असते. हलकीफुलकी इडली चटणी खाऊन पोट भरले होते! आदल्या दिवशी मुंबई विमानतळावरून डोंबिवलीस आलो तेव्हा सकाळी सुषमाने गरम गरम उपमा केला होता. प्रचंड भूक लागली होती त्यामुळे तो खाताना खूप बरे वाटत होते!   काही वेळाने अर्चना  आली व येताना गरम साबुदाणा खिचडी घेऊन आली. भारतात आल्या आल्याच खादाडीला सुरवात झाली होती. आईकडे जेवण झाल्यावर थोडी डुलकी घेतली. संध्याकाळी दूधवाला चिकाचे दूध घेऊन आला. बरेच वर्षांनी खरवस खाण्याचा योग आला होता.





आईकडे आल्यावर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. तब्बल १२ वर्षांनी भारतामधली दिवाळी अनुभवत होतो. खाऊवाले पाटणकर यांच्याकडून कडबोळी घेतली.   मला आवडते म्हणून खारी आणि राजगिऱ्याच्या वड्याही घेतल्या. शिवाय दोन तीन प्रकारच्या गोळ्या व बिस्किटेही घेतली. ह्या दुकानासमोरच्या दुकानातून उटणे, वासाचे तेल, अत्तरे याचीही खरेदी झाली. ठिकठिकाणी  आकाशकंदील विक्रीकरता झळकत होते. आकाशकंदील किती बघू नि किती नाही असे मला झाले होते. आकाशकंदिलाची खरेदी झाली. रांगोळी, रंग, घेतले. व माझ्याकरता आईने फुलबाज्याही घेतल्या! ड्रेसच्या कापडाची खरेदी झाली. काही ब्लाऊजपिसेस घेतले. लुंकडकडे ड्रेस मटेरियलच्या थप्याच्या थप्प्या विक्रीसाठी होत्या. ते बघण्यात खूप वेळ गेला. शेवटी २ ड्रेसची कापडे घेतली. एक पाडव्याच्या ओवाळणीसाठी व एक माझ्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त देण्याकरता. खूप वेळ भटकून जोरदार भूक लागली. मग खादाडीही केली. मसाला डोसा व चहा अप्रतिम होता. बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूच्या बोळात एका गुजराथ्याचे दुकान आहे तिथे हा डोसा १७ रूपयात मिळतो. बऱ्याच वर्षानंतर भट्टीतले खारे दाणे खाल्ले. हे खारे दाणे घरी पण करता येतात त्यामुळे तेही केले.






दुसऱ्या दिवशी परत आमची खरेदीकरता बाहेर फेरी. मी, बाबा व आई तिघेही परत १० च्या सुमारास रिक्शात बसलो. ग्रीन बेकरीत बटाटावडा, इडली व समोसे खाल्ले. नंतर लगेच रसवंतिगृहामध्ये रस! हा रस मी कधीही चुकवत नाही. नंतर चितळे स्वीट मार्ट मधून लुटालूट! खास दिवाळीकरता बेसन, रवा व मोतीचूर लाडू व अनारसे ! शिवाय साटोऱ्या, आंबा बर्फी, काजुकतली, पेढे, सुतरफेणी, माहीम हलवा, बाकरवडी, शेव, फरसाण. यादी खूपच लांबलचक होती. ओल्या नारळाच्या करंज्या व चकल्यांची ऑर्डर आईने जवळच राहणाऱ्या एका ओळखीच्या बाईंकडे दिली होती. आईला आता होत नाही त्यामुळे गेले २ ते ३ वर्षे ती हे सर्व विकतच आणते. मलाही यंदाच्या भारतभेटीत हे सर्व  आयते खायला मिळाले होते. अमेरिकेत दिवाळीत मी थोडे थोडे सर्व करते. त्याचीही मजा येतेच पण तरीही भारतातली मजा काही निराळीच! चिवडा मात्र मी घरी केला. आईला सांगितले  तू मला सर्व सामान काढून दे आणि बाहेर बस. मी सर्व काही करते. अजिबात सूचना देऊ नकोस. बाकी कशात नाही तरी चिवडा करण्यामध्ये मी बऱ्यापैकी तरबेज झाली आहे. आईला चिवड्याची चव बघायला सांगितली आणि म्हणाले तुझ्या पसंतीस उतरला आहे का? तर म्हणाली, छानच झालाय! पण थोडी साखर हवी होती. पूर्वीच्या सर्वच कोब्रा बायका नारळ, दाण्याचे कूट आणि साखर यांचा स्वयंपाकात सढळ हाताने वापर करतात ना!






यावर्षीचा प्रत्येक दिवस इतका काही छान गेला की अगदी कायम लक्षात राहील. एके दिवशी पिठले भाकरी, तर एके दिवशी आंबोळी, तर एके दिवशी चकोल्या! मला भाकऱ्या थापायला खूपच आवडतात. एक दिवस रविवारी झी मालिकांमध्ये काम करणारे यांचा  बक्षीस वाटप समारंभ होता. त्या दिवशी चकोल्या केल्या. दुपारी खास लोकाग्रहास्तव होणार सून मी  या घरची यातला लग्न सोहळा होता व संध्याकाळी ४ तास झी मराठीचा समारंभ. सकाळी गरम चकोल्या व रात्रीही जेवायला त्याच होत्या. त्यामुळे स्वयंपाकात जास्त वेळ  न घालवता मी व आईने मनसोक्त टीव्ही बघितला. एके दिवशी आईबाबांना लग्नाला जायचे होते. त्या दिवशी मी एकटीच घरी होते, अर्थात काही तासांपुरतीच. मग मी भाजणीचे थालीपीठ जेवायला केले. गरम गरम थालीपीठ खाताना एकीकडे विविध भारतीवरची हिंदी गाणी ऐकत होते. हा दिवसही वेगळाच गेला.






यावर्षी तुळशीबागेत खरेदीनिमित्त दोन चार वेळा चकरा झाल्या. बऱ्याच वर्षानंतर काचेच्या बांगड्या भरल्या. दिवाळीत रांगोळी काढायची हौस करून घेतली. ठिबक्यांच्या रांगोळ्या काढताना हात दुखत होते आणि बसून रांगोळीत रंग भरताना पाठही दुखत होती. वेलबुट्टी व नक्षीही काढली. बाबांनी नेहमीप्रमाणेच मोराची व हत्तीची रांगोळी काढली. आकाशकंदिलाकडे तर सारखे पाहत राहावेसे वाटत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर मी बाल्कनीतच काही तास उभी होते. भुईनळे, फुलबाज्या, फटाक्यांचे आवाज हे सर्व बघताना छान वाटत होते. मी लहान मुलाप्रमाणे फुलबाज्या उडवल्या. चारही दिवस पक्वान्नांचे जेवण जेवलो. विनायकचे काका, चुलत बहिणी, चुलत भाऊ, आई यांच्याकडे जेवणे व गप्पा ठोकणे हाच कार्यक्रम चार दिवस चालू होता. पक्वान्नामध्ये बासुंदी, गुलाबजाम, फ्रूटसॅलड, दुधी हलवा होते. दुधी हलवा पाडव्याच्या दिवशी आईकडे होता आणि त्याची फर्माइश मी आधीच फोनवरून बोलताना केली होती. सुहासदादाने आठवणीने येऊन मला भाऊबीज  घातली. बऱ्याच वर्षानंतर भाऊबीजेचा आणि पाडव्याचा ओवाळण्याचा कार्यक्रम झाला.







आईकडे रोज सकाळ, दुपार, रात्र भरपूर विविध भारतीवर गाणी ऐकली. मला आवडणारी कामे केली. गॅसवर चहा, कपडे वाळत घालणे, केर काढणे, नारळ खरवडणे, भाकरी थापणे इत्यादी. दरवर्षी मी थालीपिठाची भाजणी नेते. ती जवळजवळ ६ किलो भाजली. आईने काही मायक्रोवेव्हवर भाजून दिले. आईचे पाय चेपले, एकदा मी आईला व एकदा आईने मला गरम गरम पोळ्या वाढल्या. आईच्या आवडीचे तिला गरम गरम खायला करून घातले. बटाट्याचा कीस, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे हे आमच्या दोघींचे खूप आवडते पदार्थ आहेत. त्यामुळे आम्ही दोघींनी ते चवीचवीने खाल्ले. आईकडचे साजूक तूप, लोणीही खाल्ले. रोज सकाळी बाबांच्या हातचा चहा आणि आईच्या हातचा मऊभात असायचा.






 
एक दिवस अंजलीचा फोन आला व तिने मला विचारले आहे का तुला २/३ दिवसात वेळ? तसा तिलाही खूप वेळ नव्हता. ती पण तिच्या दिवाळसणा निमित्ताने खूप व्यग्र होती. योग होता म्हणून भेट झाली. त्या दिवशी आम्हाला दोघींनाही वेळ होता. मलाही कुठे जायचे नव्हते. मी व आई तिच्या घरी गेलो. तिचे नवीन घर मी प्रथमच पाहिले. तिच्याकडचा दिवस खूप छान गेला. सिमलामिरचीच्या भाजीचे कौतुक तिच्याकडून फोनवर ऐकले होते. भाजी खूपच सुंदर झाली होती. जेवणानंतर तिने तिच्या कामवालीच्या सुनेला बोलावले होते मला मेंदी काढण्याकरता. बऱ्याच वर्षानंतर माझ्या हातावर मेंदी रंगली. ही तिची भेट तर मला खूपच आवडून गेली. नंतर संध्याकाळी माझ्या आवडीची साबुदाणा खिचडी तिने केली. त्याची चव अजूनही माझ्या आठवणीत आहे. तिची नणंद शंकरपाळे व शेव करते. त्याची पाकिटे तिने आम्हाला दिली. चव अप्रतिम होती! शंकरपाळे व खारी मीच एकटीने चहाशी खाऊन संपवली. अंजलीकडून निघताना आईने तिला व तिच्या यजमानांना जेवायचे आमंत्रण दिले. त्या दिवशी तिच्या आवडीचे बटाटेवडे केले होते. डाळिंब्या, वरण भात, नारळाची चटणी,, बटाटेवडे व पाव असा बेत त्या दोघांना खूपच आवडून गेला.






३ वर्षांनी आम्ही मनोगती दादरला छायाताईंकडे भेटलो. दादर पुणे एशियाडने जाण्याचा अनुभव बऱ्याच वर्षांनी घेतला. छायाताईंकडे मला नेहमीच खूप आराम मिळतो. त्यांच्या घराच्या खिडकीतून समुद्राला पाहता येते. समुद्राचे गार वारे खायला मिळते. छायाताईंकडचा तो दिवस खूप सुंदर गेला. ओघवत्या गप्पांचा आनंद दिवसभर घेत होतो. मी, विनायक, सौ व श्री पटवर्धन, मिलिंद फणसे, राधिका जमलो होतो. बाहेर जेवणाचा कार्यक्रम पण सुंदर झाला. छायाताईंनी युरोप ट्रीप केली त्याचे फोटो बघितले. खूप सुंदर फोटो टीव्हीच्या पडद्यावर छानच दिसत होते. दरवेळच्या भारतभेटीत जसे जमेल तितक्या नातेवाईक व मित्रमंडळींना भेटते. सुहासदादाच्या कारमधून निगडीला अनिताच्या घरी जाऊन आलो. त्या दिवशी कारचा प्रवास छान वाटून गेला. प्रवासात पुण्याचे बदलते रूप पाहत होते व आठवणींना उजाळा मिळत होता. तशीच संध्याकडेही आईबाबांबरोबर जाऊन आले. तिथेही खूप आराम मिळाला. संध्याने मला ज्वारीचे व नाचणीचे पापड दिले. मीराताईंची भेट पुण्यामध्ये ठरवूनही झाली नाही याची रुखरुख मनाला लागून राहिली आहे. काही कामाकरता मला डोंबिवलीस  ठरलेल्या वाराच्या आधीच जावे लागले आणि तसेच पुढे आम्ही दोघे मुंबई विमानतळावर अमेरिकेस रवाना होण्याकरता गेलो.






अमेरिकेत परतण्या आधी मोजून ३ दिवस डोंबिवलीस आले व काही रेंगाळलेली कामे उरकत होतो, तरीही ती पूर्ण झालीच नाहीत. काही झाली काही राहिली. कामे उरकण्याच्या निमित्ताने डोंबिवलीतच होतो त्यामुळे मी ऑर्कुटवर २००५ मध्ये झालेल्या २ मैत्रिणींना त्यांच्या डोंबिवलीच्या घरी भेटले. स्मिता चावरे व रमा काळे या दोघींनाही माझ्याइतकाच आनंद झाला होता. स्मिताकडे साजूक तुपातला बुंदीचा लाडू आणि रमा कडे माझे अत्यंत आवडते पोह्याचे डांगर खाल्ले.   शिवाय तिने मला अनारसा पीठही दिले. तसेच अर्चनाकडेही गेलो, तिने पावभाजी व शेवयांची खीर केली होती. डोंबिवलीच्या मार्केटमधून काही कामानिमित्त बरीच फिरले. डोंबिवलीला एक फेरफटका झाला. फिरताना पूर्वीच्या आठवणी येत होत्या.   यावर्षी आमचे सोसायटीतले मित्रवर्य यांच्या हातची साबुदाणा खिचडी खाल्ली.   अत्यंत चविष्ट अशी ही खिचडी होती. या खिचडीची एक वेगळी पद्धत आहे. त्यानुसार एकदा करून पाहणार आहे. शिवाय इडली सांबार चटणी आणि शेगावची कचोरीही त्यांनी एकदा न्याहरीला आणली होती. शैलाताई दरवर्षी आम्हाला जेवायला बोलावतात. जेवणामध्ये दर वेळेस वेगळा आणि छान चविष्ट मेनू असतो. यावेळी बटाटा परोठे, टोमॅटो सूप आणि आइसक्रीम होते. नेर्लेकर व आमच्या घरी कामाला येणारी इंदुबाई हिच्या हातच्या तलम भाकरी खाण्याचा एक छान योग जुळून आला. इंदूबाईने धुणे भांड्यांची कामे सोडून स्वयंपाकाची कामे धरली आहेत. अतिशय कष्टाळू आहे. तिचे दैनंदिन रूटीन ऐकून मी थक्कच झाले. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत ही काम करत असते.






दरवर्षीच्या भेटीत काही ना काही उरतेच अर्थात ते पुढील भारतभेटीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी विनायक व त्यांच्या चुलतबहिंणींची भाऊबीज छान झाली. जयसिंगपुरच्या बहिणीने खूप फिरवले. गणपतीपुळे, नरसोबाची वाडी, सांगलीचा गणपती, कोल्हापूर अशी बरीच भटकंती झाली.     पुण्यावरून डोंबिवलीला येताना सूर्यास्ताचा फोटो चालत्या गाडीतून काढला. खूप सुंदर दिसत होता. शिवाय परतीच्या प्रवासात अटलांटा विमानतळावर अजून एक सुंदर सूर्यास्त पाहायला मिळाला. त्याचाही फोटो घेतला.






२०१३ ची भारतभेट अतिशय सुंदर झाली. बरीच खादाडी, आवडती कामे आणि आराम असे सर्व काही झाले. काहींना भेटायचे राहून गेले ते पुढील भारतभेटीत जमवणार. मन प्रसन्न व ताजेतवाने झाले. काही वेळेला मात्र खूप बडबड करून आणि माणसांचे आवाज ऐकून डोके भणभणायला लागायचे. तर काही वेळेला रस्त्यातली गर्दी पाहून चिडचिड व्हायची. अमेरिकेतल्या घरी आल्यावर मात्र इथली भयाण शांतता खूप टोचायला लागली आहे. भारतातल्या आठवणीत रमावेसे वाटते पण कुठेतरी रूटीनला सुरवात केलीच पाहिजे म्हणून सर्व आठवणी जेव्हा कागदावर उतरवते तेव्हा जरा हलके झाल्यासारखे वाटते! आता पुढच्या भारतभेटीचा ऋतू कोणता बरे निवडावा याची विचारचक्रे तूर्तास तरी मंद गतीने सुरू झाली आहेत.

Wednesday, November 27, 2013